Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. सहापैकी पाच जागेवरील उमेदवारी सहज विजयी होतील, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी सहावी जागाही जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
'सरकारमधील एक संजय जाणार'माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे म्हणाले की, ''राज्यसभेच्या तिनही जागा आम्ही शंभर टक्के जिंकणार, आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला, तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार,'' असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
संजय राऊत जाणार?संजय राऊत जाणार की संजय पवार जाणार? असा प्रश्न बोंडे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला, त्यावर ते म्हणाले की, “कोणता अश्वत्थामा गेला होता, हेदेखील धर्मराजाने सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. पण, महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार नक्की. सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात,' असंही ते म्हणाले.
भाजपचे उमेदवारभाजपने राज्यसभेसाठी पीयुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्यासह धनंजय महाडिक यांना तिसऱ्या जागेवर उमेदवारी दिली आहे. गोयल आणि बोंडे यांचा विजय निश्चित आहे, तर महाडिक यांच्या जागेसाठी रस्सीखेच आहे. विशेष म्हणजे, भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार, हे दोघे कोल्हापूरचे आहेत. त्यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.