>> यदु जोशी
मुंबई - राज्यसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे नक्की दिसत आहे. कारण, महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाचे आहेत सहा खासदार आणि उमेदवार आहेत सात. याचा अर्थ चुरस होणार हे नक्की. भाजपने तीन, शिवसेनेने दोन, राष्ट्रवादीने एक आणि काँग्रेसने एक उमेदवार दिला आहे. सहाव्या जागेसाठी घमासान होईल. घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो.
भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्यातील माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्यासोबतच धनंजय महाडिकांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला आहे. शिवेसनेचे संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसने उत्तर प्रदेशातून आणून संधी दिलेले इम्रान प्रतापगडी या सात उमेदवारांपैकी सहा जिंकतील, एकाला घरी बसावे लागेल. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची? भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील.
महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा
राज्यसभेची ही निवडणूक गुप्त मतदानाने होत नाही. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि नंतरच ते मतपेटीत टाकावे लागते. पक्षाने ज्या उमेदवाराला मत द्या म्हणून व्हिप जारी केलेला असतो त्याच उमेदवाराला मतदान करावे लागते आणि तसे केले नाही तर तुमची आमदारकी जाऊ शकते. मग या निवडणुकीत घोडेबाजाराला संधी आहे कुठे? तर ती आहे अपक्ष आमदारांच्याबाबत. राज्यातील सर्व अपक्ष आमदार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. मात्र, आपल्या सहयोगी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखविण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. उलटपक्षी अपक्ष आमदाराने मत दाखवू नये, असा नियम असल्याचे सांगितले जाते. इथेच घोडेबाजाराला संधी आहे.
“रोहित पवार आमचा पक्ष फोडतायत, शरद पवारांकडे तक्रार करेन”; शिवसेना नेत्याचा इशाराभाजपच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रात तिसरा उमेदवार देताना तो निवडून येण्याची 'सोय' करूनच दिला असेल असे म्हटले जात आहे. तसे असेल तर, शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे अडचणीत येऊ शकतात. आ.हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, शेकाप, एमआयएम, कम्युनिस्ट, मनसे हे लहान पक्ष आणि अपक्ष काय करतील यावर सहाव्या जागेचा निकाल अवलंबून असेल. केवळ पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपकडे दोन जागा जिंकून सर्वाधिक अतिरिक्त मते आहेत. त्या खालोखाल शिवसेनेकडे व नंतर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते आहेत. काँग्रेसकडे केवळ दोन अतिरिक्त मते आहेत. भाजपचे पीयूष गोयल, डॉ.अनिल बोंडे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांना कोणताही धोका दिसत नाही. भाजपचे धनंजय महाडिक की शिवसेनेचे संजय पवार हा या निवडणुकीतील औत्सुक्याचा बिंदू आहे.
राज्यातून राज्यसभेसाठी रिंगणात कोण कोण?
भाजप : पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक काँग्रेस : इम्रान प्रतापगढीराष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेलशिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार