मुंबई : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांचे आमदार कोणाला मतदान करणार याबाबत उत्सुकता आहे. त्यांनी भूमिका जाहीर न केल्याने महाविकास आघाड व भाजपचेही टेन्शन वाढले. लहान पक्षांत सर्वाधिक आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत. त्यांचे नेते हितेंद्र ठाकूर कोणासोबत जातात हे महत्त्वाचे आहे.
ठाकूर यांनी अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. ते भाजपसोबत जाणार अशी चर्चा आहे. मात्र, त्यांनी स्वत: अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही पक्षाची ॲलर्जी नाही. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ते स्वत: आणि राजकुमार पटेल हे दोन आमदार आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहू, असे कडू यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनी सांगितले की, सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले नाही, त्यांच्या कल्याणाच्या योजना राबविल्या नाहीत.
घोडेबाजार शब्दावर आक्षेप
- शिवेसेनेचे काही बडे नेते हे अपक्ष, लहान पक्षांसाठी भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचे सांगत सुटले आहेत. अपक्ष आमदारांसाठी घोडेबाजार असा शब्द त्यांनी वापरू नये. नाहीतर वेगळा विचार करावा लागेल, असे चंद्रपूरचे अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
- हा शब्द वापरल्याने अपक्षांची प्रतिमा मलिन होते, असा आक्षेप त्यांनी घेतला. मीरा भाईंदरच्या आ. गीता जैन यांची भूमिका योग्य असून, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने घोडेबाजार हा शब्द वापरणे निषेधार्हच आहे, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
- मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी, अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख हे त्यांचे नेते असल्याचे व त्यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण असल्याचे सांगत महाविकास आघाडीसोबत राहू, असे स्पष्ट संकेत दिले.
- चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी ते सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करतील, असे सांगत गूढ वाढविले आहे.
- बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा हे भाजपसोबत जातील. रवी राणा हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात.
- राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. मनसे कोणासोबत जाणार हे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.
- मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मी सेनेसोबतच राहणार, असे त्या म्हणाल्या.
आमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे ६ जूनला मुंबईत आहेत. त्यावेळी बैठकीत ओवेसी यांच्या आदेशानुसार राज्यसभा निवडणुकीसाठीची आमची भूमिका निश्चित केली जाईल. -इम्तियाज जलिल, खासदार, औरंगाबाद.
माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी बोलून मी येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेईन. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांशीदेखील चर्चा करेन. - विनोद निकोले, डहाणूचे माकप आमदार.