मुंबई - Ashok Chavan's resignation ( Marathi News ) महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणकाँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या प्रवेशाला राज्यसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते असं बोलले जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेच्या उमेदवारांचे अर्ज भरले जाणार आहेत. राज्यात ६ जागांसाठी ही निवडणूक होईल. त्यात भाजपाकडून चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे. जर भाजपाच्या चौथ्या उमेदवाराला निवडून आणायचे असेल तर महायुतीसह आणखी काही मतांची बेरीज भाजपाला करावी लागणार आहे. त्यात मागील निवडणुकीसारखं भाजपा यंदाच्या राज्यसभा निवडणुकीतही धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याकडे पाहिले जाते.
गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. यावेळी भाजपाने मते कमी असतानाही त्यांचा उमेदवार निवडून आणला होता. या निवडणुकीत तेव्हाच्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसची काही मते फुटल्याचा दावा केला जात होता. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता. सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतरच्या विधान परिषद निवडणुकीतही मविआचे मते फुटली होती आणि काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. या निवडणुकांनंतर शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री बनले.
आता राज्यात पुन्हा एकदा राज्यसभा निवडणूक लागली आहे. यावेळीही भाजपा धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत आहे. त्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याचे संकेत मिळालेत. अशोक चव्हाण यांना भाजपाने जर राज्यसभेची उमेदवारी दिली तर या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक आमदार पक्षाविरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. त्यात राज्यसभेचे मतदान गुप्तपद्धतीने घेतले जात असल्याने मतदानात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशोक चव्हाणांना उमेदवारी द्यायची असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देणे गरजेचे होते. त्यानुसार एक एक पाऊल भाजपा पुढे टाकताना दिसत आहे.