राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतदानावेळी भाजप आमदार पराग अळवणी यांनी महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत ही मते बाद करावीत अशी मागणी केली. याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. दरम्यान, मतमोजणीलाही विलंब होत आहे. यावरून आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला!, आता रडीचा डाव सुरू झाला!!, आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!,” असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केला.
नक्की काय घडलं?जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही प्रतिसाद येत नाही तोवर मतदानाला सुरूवात होणार नाही. भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले. महाराष्ट्र आणि हरियाणा येथे राज्यसभा निवडणुकीत उघडपणे मतदानाच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले. त्याबाबत स्थानिक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानात झालेल्या नियमभंगामुळे ही मते बाद करावीत अशी मागणी आम्ही केलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले.