मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि.१०) मतदान झाले. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी थांबवली आणि बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरविण्यात आली. यानंतर यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्लाबोल केला. "महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारा हा दिवस आहे. राज्यात आधीही निवडणुका झाल्या पण अशाप्रकारे कुणीही लोकशाहीला वेठीस धरले नाही. भाजप सारखं कृत्य कुणीही केलेलं नाही. त्यांनी मतमोजणी थांबवली. भाजपने मतदान थांबवले, हे कृत्य लोकशाहीला थप्पड मारणारे होतं. त्यासाठी त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. अशा डावपेचांचा कसा सामना करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेले आहे", असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीला शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. तर शिवसेनेकडून रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांनी मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरविण्यात आली.