मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नव्हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसेच, धनंजय महाडिक हे संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला.
आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार याठिकाणी विजयी झाले आहेत. सगळ्यात आधी हा विजय आहे तो मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. दोन्ही आमदार आजारी असूनही मतदानासाठी आले. लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मोठा प्रवास करून ते इथपर्यंत आले. माझ्या पक्षासाठी मी येणारच असे ते म्हणाले होते आणि ते आले. त्यांचे मी आभार मानतो. मुक्ता टिळक यांचेही आभार मानतो. हा विजय हा सर्वार्थाने महत्वाचा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्हाला मतदान करणाऱ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई समजतात. त्यांना या विजयाने लक्षात आणून दिले. महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईतील जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे आहोत, हे दाखवून दिले आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
याचबरोबर, राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला होता. पण तो कौल आमच्या पाठीत सुरा खुपसून काढून घेतला होता. पीयूष गोयल, बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते मिळाली. धनंजय महाडिक यांना ४१.५६ मते मिळाली. ती संजय राऊत यांच्यापेक्षाही जास्त आहेत. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे मोठं गिफ्ट दिले आहे. वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचा पैलवानच भेट दिला आहे. जे मत शिवसेनेचे बाद झाले, ते ग्राह्य धरले असते तरी आमचा विजय झाला असता. मलिक यांना कोर्टानं परवानगी दिली असती तरी आमचा विजय झाला असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी झाले. तर सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.
आमदारांना फोडण्यात भाजपला यशमहाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे. दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.