कोल्हापूर-
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर कुठल्याही पक्षानं संभाजीराजेंबाबत ठोस भूमिका न घेतल्यानं त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. पण यासर्व राजकारणामागे भाजपाचीच खेळी असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शाहू छत्रपतींच्या विधानावर अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
संभाजीराजेंनी 'अपक्ष' लढावं ही तर फडणवीसांची खेळी; शाहू छत्रपतींचा खळबळजनक आरोप"छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही", असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
संजय राऊत घेणार भेटसंभाजीराजे छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे आशीर्वाद मी जाऊन घेणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच शाहू छत्रपतींच्या विधानाचं कौतुकही केलं आहे. "कुणीतरी संभाजीराजेंना पुढे करून महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट झालं आहे. आजही कोल्हापुरच्या मातीत प्रामाणिकपणा जिवंत आहे. मी शाहू छत्रपतींना भेटणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले शाहू छत्रपती?पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शाहू छत्रपती यांनी मोठा खुलासा केला आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. त्यावर हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची खेळी होती. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं यासाठी भाजपाने त्यांना भाग पाडलं असं त्यांनी सांगितलं.
इतकेच नाही तर बहुजन समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावं यासाठी भाजपानं जाणीवपूर्वक ही खेळी खेळल्याचा आरोप त्यांनी केला. जानेवारी महिन्यापासून संभाजीराजे खासदारकीसाठी प्रयत्नशील होते. आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. दीर्घकाळ लढाई करावी लागेल. हा संघर्ष खूप मोठा आहे असंही छत्रपती शाहूंनी म्हटलं.