उस्मानाबाद - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपाचे ३ उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत होती. सुरुवातीच्या मतमोजणीत शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे इमरान प्रतापगढी पहिल्या पसंतीची मते घेऊन निवडून आले. परंतु सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात चुरस निर्माण झाली.
राज्यसभेच्या निकालात शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले. त्यानंतर आता विरोधकांनी शिवसेनेवर चहुबाजेने टीका सुरू केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर(MNS Bala Nandgoankar) म्हणाले की, अपक्ष आमदारांना खूप चांगल्या प्रकारे सांभळावं लागतं. अपक्ष आमदार स्वत:च्या ताकदीवर पैसे खर्च करून निवडून येतात. ५ वर्ष त्यांची जी काही कामे असतात ती करावी लागतात. एकंदरीत अपक्ष आमदारांची नाराजी सरकारवर होती. पक्षाच्या आमदारांचीही कामे होत नाहीत. त्यामुळे कुरबूर होती असं त्यांनी सांगितले.
तसेच पक्षातंर्गत नाराजीचा फटका शिवसेनेला बसला आहे. आताही वेळ गेलेली नाही. आपली लोक आपल्याला सांभाळावी लागतात. प्रेमाने सांभाळावी लागतात. आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत. बाळासाहेबांच्या एका आदेशाने ते घडत होते. आता पक्षप्रमुखांनी पक्ष सांभाळावा, आजूबाजूच्या लोकांनी नव्हे अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे.
भाजपाचाही टोलासंजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी. यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे लगे. धक्का लगाल्यानंतरही विचारलं तर शरद पवार म्हणतील लागले नाही. ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे वीस तारीख आहे. त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे. त्यांना धक्क्यावर धक्के सहन करावेच लागणार आहे. तेव्हादेखील त्यांनी म्हणावे की काही लागले नाही, असा खोचक टोला भाजपचे विजयी उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. मुख्यमंत्र्यांना आज कोणता आमदार भेटू शकतो? मंत्रीतरी भेटू शकतो का? अशी विचारणा करत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.