मुंबई - महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीतील सहाव्या जागेवरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यविरोधी पक्ष असलेला भाजपा आमनेसामने आले होते. कोल्हापूरमधील उमेदवार उतरवत दोन्ही पक्षांत गेले १०-१५ दिवस खेळवल्या गेलेल्या या कुस्तीत अखेर भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या विजयानंतर भाजपाकडून शिवसेनेना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. आता त्याला शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात येऊ लागले आहे. एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही, असा टोला शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
दीपाली सय्यद यांनी राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या भाजपाला ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही. एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही. एका राज्यसभेने कोल्हापूरची पोटनिवडणुक जिंकता येत नाही. १०६ काय १३० असू द्या, पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.
दरम्यान, काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा आज पहाटे जाहीर झाला होता. त्यात भाजपाचे पियूष गोयल, अनिल बोंडे, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत हे पहिल्या पसंतीची मतं मिळवून विजयी झाले. तर भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आवश्यक तो कोटा मिळवून धनंजय महाडिक विजयी झाले होते.