मुंबई - काल झालेल्या राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीमध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या महाविकास आघाडीसोबत असल्याचे दाखवणाऱ्या काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी भाजपाच्या धनंजय महाडिक यांना मतदान केल्याने निवडणुकीचे चित्र बदलल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच काही अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत कुणाला मतदान केलं, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.
संजय राऊत यांनी बविआची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असं म्हटलं आहे, अशी विचारणा केली असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, ते काय बोलले हे मला माहिती नाही. मतदान गुप्त असतं. त्यांच्या त्यांच्या पक्षांची मतं ते आपल्या प्रतिनिधील दाखवून टाकतात. मात्र आमच्यासारखे छोटे पक्ष, अपक्षांना मत दाखवण्याचं बंधन नसतं. विधानसभेत अशी एकूण ३० मतं आहेत. त्यामुळे अमूक एक मतं मिळाली नाहीत, असं कुणी सांगू शकत नाही. आम्हाला जेवढे उमेदवार तेवढी मतं देता येतात. आम्ही जे निवडून आलेले उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगडी, संजय राऊ, पियूष गोयल, अनिल भोंडे आणि मुन्ना महाडिक यांना प्राधान्यक्रमानुसार मतं दिली आहेत, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेले घोडेबाजाराच्या आरोपावरही हितेंद्र ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते समजदार असतील तर असं बोलणार नाहीत. कुठलाही राजकारणी माझ्यावर असा आरोप करणार नाही. मी आमदार आहे घोडा नाही. मी त्यादिवशीही बोललो आहो. नॉट फॉर सेल. मला विकत घेणारा पक्ष बघायचा आहे.