मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सहा जागेसाठी सात उमेदवार उभे राहिल्याने सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास मविआ नेते व्यक्त करत आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या आमदारांची हॉटेल ट्रायडंटला बैठक पार पडली. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठी भूमिका अपक्ष आणि इतर घटक पक्षांची राहणार आहे.
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडे ३ मतांचा कोटा आहे. त्यामुळे बविआ नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीसोबत भाजपानेही सुरू ठेवले आहेत. भाजपा नेते धनंजय महाडिक, गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. तत्पूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनीही ठाकूर यांची भेट घेत मविआलाच मतदान करण्याची गळ घातली. परंतु अद्याप हितेंद्र ठाकूर यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही.
आता हितेंद्र ठाकूर यांच्याशी संवाद साधायला थेट मविआचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे यांच्या मोबाईलवरून शरद पवारांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीत बविआचे मतदान महाविकास आघाडीला मिळावं यासाठी पवारांनी ठाकूर यांच्याशी चर्चा केली. परंतु पवारांच्या फोननंतरही ठाकूर यांनी माझा निर्णय १० तारखेलाच होईल असं सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे.
हितेंद्र ठाकूर म्हणाले की, शरद पवारांना जे बोलायचं होतं ते त्यांनी सांगितले. ते ज्येष्ठ नेते आहेत. कुठल्याही पक्षातील नेत्यांशी ते सहजपणे संपर्क साधू शकतात. शरद पवार हे मोठे नेते आहेत. माझी भूमिका ही १० तारखेलाच ठरवू. कुणाशी काय बोलणं झाले हे सांगणं योग्य नाही. चर्चा बाहेर सांगण्याची प्रथा नाही. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे. ज्याचे उमेदवार उभे आहेत त्यांनी मतदारांना भेटणं गरजेचे असते. सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांची माझे बोलणे झाले असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.