मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला. तर इतर जागांवर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकून भाजपने विजय मिळविल्याची टीका केली आहे. "भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत, तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. भाजपने माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?" असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
याचबरोबर, काही अपेक्षित मतं बाहेरची आम्हाला पडू शकली नाहीत, हे खरं आहे. दोन चार मतांची घासाघीस झाली, कोणती मतं फुटली, हे आम्हाला माहिती आहेत. पण आमच्या प्रमुख नेत्यांनी ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. आम्हाला खात्री होती, आम्ही ही जागा जिंकू.. आम्ही जवळपास जिंकलोच आहोत. पण ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे. पहिल्या क्रमांकांची मते, दुसऱ्या क्रमाकांची मते... वगैरे वगैरे... या टेक्निकल टर्ममध्ये भाजपचा विजय झाला आहे. आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार म्हणजेच पक्षाचे आमदार फुटले नाहीत तर काही अपक्ष आमदार, काही छोट्या पक्षाचे आमदार फुटले आहेत. त्यांना काही आमिषं दाखवण्यात आली. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.