मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीला शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. तर शिवसेनेकडून रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांनी मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरविण्यात आली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करून मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील तासाभरात राज्यसभेच्या मतदानाचा निकाल लागू शकतो. इतर ४ मतांसह मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सुहास कांदे यांचे मत बाद झाल्याने शिवसेनेला झटका बसला आहे. सुहास कांदे यांनी मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधींसह दुसऱ्या व्यक्तीलाही दाखवल्याचा आरोप होता. त्याबाबत व्हिडीओ फुटेज पाहून केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, तर अशाच प्रकारे यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली, त्यामुळे भाजपचे आमदार आशिष शेलार आणि पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली होती. मतपत्रिका दाखवायची असते, ती हाताळायला द्यायची नसते, असा निवडणुकीचा नियम आहे. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली होती. तर रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले असेल तर हे उघड करणे नियमांचे भंग आहे, असे शिवसेनेचे म्हणणे होते. तर दुसरीकडे निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवली, अशी तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली.तसेच रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवारांचे मत बाद करा, अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात आली होती.
काय म्हणाले आव्हाड?जितेंद्र आव्हाड म्हणाले, "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो. यानंतर मी गेटवर आलो. तोवर माझ्यावर कसल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले नव्हते. यानंतर मला माध्यमांकडून समजले, की माझ्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले आहे. मात्र, यासंपूर्ण प्रक्रियेत माझ्याकडून काही चूक झाल्याचे मला तरी वाटत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. उगाच महाराष्ट्रासमोर असे जायला नको, की आम्ही काही वेगळे केले आहे, काही चुका केल्या आहेत, अजिबात नाही. काही कारण नसताना काहीतरी रडीचे डाव टाकत आहेत. माझ्या मते, माझ्याकडून कसलीही चूक झालेली नाही. माझे मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचे असते, नियमाने त्यांना मतदान दाखवले. ते न दाखवल्यास माझा पक्ष मला सहा वर्षांसाठी निंलंबित करू शकतो. माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.