मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतदानावेळी भाजपा आमदार पराग अळवाणी यांनी महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत ही मते बाद करावीत अशी मागणी केली. तर भाजपाचे नेते बावचळेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी केला. परंतु आता याबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे.
जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही प्रतिसाद येत नाही तोवर मतदानाला सुरूवात होणार नाही. भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, भाजपाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले. महाराष्ट्र आणि हरियाणा येथे राज्यसभा निवडणुकीत उघडपणे मतदानाच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले. त्याबाबत स्थानिक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानात झालेल्या नियमभंगामुळे ही मते बाद करावीत अशी मागणी आम्ही केलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?राज्यसभेच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. त्याच मविआची ३ मते बाद करावीत असं भाजपाने मागणी केली आहे. पहिल्या फेरीत निवडून जाण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. राष्ट्रवादीने ९ मते शिवसेनेला दिली आहेत. भाजपाचा आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केल्यास महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवारासाठी अडचण होऊ शकते.
२०१७ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या प्रकरणातही मते बाद झाल्याने पटेल यांचा विजय झाला होता. त्यावेळी एका जागेसाठी ४५ मतांची गरज होती. मात्र काँग्रेसची २ मते फुटली होती. तेव्हा काँग्रेसच्या त्या दोन आमदारांचे मत रद्द करण्यात यावे यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. भाजपानेही पीयुष गोयल, अरुण जेटली या दिग्गज नेत्यांची रवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. शेवटी निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. मध्यरात्रीपर्यंत निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाचा तिढा सोडवला. त्यानंतर ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्यांचे २ मत बाद झाले. परिणामी विजयासाठी लागणारी मते ४५ वरून ४४ वर आली. पुन्हा मतमोजणी करत अहमद पटेल यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणुकीत तिढा निर्माण झाला आहे. त्याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. त्यामुळे मतमोजणी खोळंबली आहे.