मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी नाट्यमय घडामोड घडली आहे. भाजपाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेप घेतले. यानंतर भाजपा शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली. भाजपाने घेतलेल्या आक्षेपानंतर राज्यसभेची मतमोजणी थांबवण्यात आली होती. तब्बल ८ तासांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेतला.
निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले. सुहास कांदे यांचे मत नेमकं का बाद झाले याबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्या आदेशात स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने आदेशात म्हटलंय की. कांदे यांनी मतपत्रिका फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेली. पोलिंग एजेंटला दाखवताना त्यांची मतपत्रिका कॅमेऱ्यात तशी शेजारच्या क्युबिकलमध्ये दिसली. तसेच न दुमडलेली मतपत्रिका घेऊन ते फिरत होते आणि काहींशी बोलत होते. या सर्व प्रकारात मतपत्रिकेत कुणाला मत दिले हे दिसत असल्याने ते नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचे आदेश दिले आहेत.
सुहास कांदे यांनी दिलं स्पष्टीकरण
मला अद्याप निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही. मी मतपत्रिका पक्षाच्या प्रतोदाला दाखवून फोल्ड केली होती. तो कागद इतका छोटा आहे. मी फोल्ड केले होते मग ती इतरांना कशी दिसेल. वरिष्ठांशी चर्चा करून या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ असं सुहास कांदे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच विजयी होईलमहाविकास आघाडीकडे जेवढे संख्याबळ लागते त्यापेक्षा अधिक मते आहेत. सहकारी आणि अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मतमोजणीला सुरुवात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले होते. त्यातील १ मत बाद झाल्यानंतर आता २८४ मतांची मोजणी केली जाईल. या निवडणुकीत भाजपाचे पीयुष गोयल, अनिल बोंडे, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी मतांचा कोटा सुरक्षित ठेवला आहे. सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत आहे. अपक्ष, घटक पक्षांच्या मतांवर शिवसेनेच्या संजय पवार यांच्या विजयाचं भवितव्य ठरणार आहे.