घोडेबाजार टळला...! राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, सहा जागा सहा उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 05:35 AM2024-02-15T05:35:12+5:302024-02-15T07:30:52+5:30
भाजप : अशाेक चव्हाण यांच्यासह तिन्ही नवे चेहरे, राष्ट्रवादीचे पटेल, काँग्रेसचे हंडोरे, शिवसेनेचे देवरा
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा सदस्यांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपने चौथा उमेदवार दिलेला नाही आणि महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिला त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
आता भाजपचे तीन, मित्र पक्षांचे प्रत्येकी एक याप्रमाणे सत्तारुढ महायुतीचे पाच आणि काँग्रेसचे एक असे सहा जण बिनविरोध निवडले जातील असे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (गुरुवार) शेवटचा दिवस आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना लगेच राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. मेधा कुलकर्णी या पुण्यातील माजी आमदार आहेत, तर डॉ. गोपछडे हे नांदेडचे असून संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत.
काँग्रेसने उमेदवारी दिलेले माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे (मुंबई) यांचा जून २०२१ मधील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असूनही पराभव झाला होता. आता त्यांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांनी नुकताच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपने चौथा उमेदवार न दिल्याने घोडेबाजार टळला आहे.
तीन वर्षे बाकी असतानाही प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी
राज्यसभा सदस्य असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देत पक्षाने धक्का दिला. पटेल यांचा सध्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ मे २०२७ मध्ये संपणार आहे तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली. कारण राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते पक्षाचे असे एकटेच राज्यसभा सदस्य आहेत जे अजित पवारांसोबत आहेत. अन्य सदस्य शरद पवार यांच्यासोबत आहेत.
कारण काय - शरद पवार गटाने पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका राज्यसभा सभापतींकडे केलेली आहे. उद्या त्याचा निकाल आला व पटेल यांचे सदस्यत्व रद्द झाले तर त्यांना खासदारकी गमवावी लागेल. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. बाबा सिद्दिकी, पार्थ पवार ही चर्चेतील नावे मागे पडली. तांत्रिक कारणांमुळे पटेल यांना उमेदवारी देत आहोत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.