मुंबई - भारतीय जनता पक्षाने ज्या दोन नेत्यांना आमदारकी नाकारली होती. त्यांना आता राज्यसभेची संधी दिली आहे. त्यात पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना पुण्याच्या कोथरूड मतदारसंघात उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांना पक्षाने कोथरूडमध्ये उमेदवारी दिली आणि ते जिंकले.
याच मतदारसंघात मेधा कुलकर्णी यांनी २०१४ मध्ये ६४,६६२ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला होता. मात्र, २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पाटील हे २५,४९५ मतांनी जिंकले होते. मेधा कुलकर्णी यांच्यावर झालेला अन्याय त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन दूर करण्यात आला आहे. कुलकर्णी यांना संयमाचे फळ मिळाले. तर, अशोक चव्हाण व डॉ. गोपछडे यांच्या रुपाने नांदेड जिल्ह्यातून दोन जण राज्यसभेवर जाणार आहेत.
संधीचे करू साेने : डाॅ. कुलकर्णी
भाजपकडे पुण्यात ब्राह्मण चेहरा नव्हता. त्यामुळे उमेदवारी दिली, हा टीकात्मक मुद्दा डॉ. मेधा कुलकर्णी यांनी खोडून काढला. ही निवड जातीय दृष्टिकोनातून नाही तर पक्षनिष्ठ, कामाची दखल यातून घेतली आहे, असा दावा डॉ. कुलकर्णी यांनी केला. पक्षाचे काम निष्ठेने करत राहिले. पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही महिला आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देत कामावर विश्वास दाखवला. ते काम करत राहिले, त्यामुळेच ही उमेदवारी मिळाली. आता या संधीचेही सोने करू.
डॉ. गोपछडेंना श्रीराम पावले
बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव या गावात १९ नोव्हेंबर १९७० रोजी जन्मलेले डॉ. अजित गोपछडे हे बालपणापासूनच संघाच्या शाखेत जात होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९९२ मध्ये काढलेल्या रथयात्रेत त्यांनी सहभाग घेतला होता. ६ डिसेंबरला बाबरी पाडण्यात आली. त्यावेळी घुमटावर चढणाऱ्यांपैकी एक गोपछडे होते. त्यावेळच्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते. योगायोग म्हणजे काही दिवसांपूर्वीच अयोध्येत श्रीरामाचे मंदिर पूर्ण झाले अन् आता गोपछडेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली.
प्रदेश भाजपने पाठविली होती १४ नावे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी पक्षाने दिली. चव्हाण यांना भाजपमध्ये घेताना राज्यसभेवर पाठविण्याचे ठरलेले होते. भाजपच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्र भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे मागविली होती. त्यानुसार प्रदेश भाजपने १४ नावे पाठविली होती. त्यात मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश होता. तसेच पंकजा मुंडे यांचेही नाव पाठविण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.
विधानपरिषद हुकली, पण, राज्यसभेची लागली लॉटरी डॉ. अजित गोपछडे हे भाजपच्या वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ते संघाचे प्रचारकही राहिले आहेत. लिंगायत समाजाचे असलेले गोपछडे यांना मे २०२० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाने उमेदवारी जाहीर करूनदेखील माघार घेण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांची विधान परिषदेची संधी गेली, पण आज त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय पक्षाने घेतला.
पंकजा मुंडे प्रतीक्षेतचमाजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव प्रदेश भाजपने सुचविले होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यानंतर प्रत्येक राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी त्यांचे नाव चर्चेत येते, पण संधी मिळत नाही.