Rajyasabha Election 2022: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या काही दिवसात निवडणूक होणार आहे. यातील सहाव्या जागेसाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेवर आपल्याला संधी द्यावी अशी विंनती संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वच पक्षांना केली आहे. त्यानंतर शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांना पक्षात येऊन ही जागा लढवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
'संभाजीराजेंना अडकवण्याचा प्रयत्न'औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ''राज्यसभेच्या साहव्या जागेचा निर्णय भाजपने केलेला नाही. आमच्या संसदीय बोर्डाची बैठक होईल त्यात या विषयावर चर्चा होईल. संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यात काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधावे त्यांनतरच त्यांना उमेदवारी देऊ असं मी माध्यमात पाहिले. पण, त्यांना शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे,'' अस दानवे म्हणाले.
'...तर संजय राऊत यांची जागा'ते पुढे म्हणतात, "ते राजे आहेत त्यामुळे त्यांना निवडणुकीत न उतरवता राष्ट्रपती कोठ्यातून सन्मानपूर्वक खासदारकी देण्यात यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती आणि आम्ही त्यांना त्यावेळी खासदारकी दिली. पण, आता शिवबंधन बांधा असे सांगून संभाजीराजेंना अडकवण्याचा शिवसेनकडून प्रयत्न केला जातोय. शिवसेनेला राजेंचा सन्मान करायचा असेल तर त्यांच्या सुरक्षित जागेवर त्यांना उमेदवारी देण्यात यावी आणि सहाव्या जागेवर संजय राऊत यांना उमेदवारी देण्यात यावी," असं दानवे म्हणाले.