मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकीय खलबतं वाढली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. भाजपानंराज्यसभा निवडणुकीत माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा भाजपाला देऊ असा प्रस्ताव बैठकीत दिला. परंतु हा प्रस्ताव भाजपानं नाकारला आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.
काँग्रेसनं राज्याबाहेरील उमेदवार दिल्यानं अनेक काँग्रेस आमदार नाराज असल्याची बातमी आहे. इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानं राज्यातील काँग्रेस नेते नाराज असल्याचं दिसून येते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजपा नेत्यांची बैठक घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली परंतु त्याला यश आले नाही. राज्यसभा निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. काँग्रेसमध्ये नाराजी असल्यानं भाजपानं एकाची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले.
भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसला सत्तेत राहून नेमकं मिळतंय काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतो. भाजपाच्या भूमिकेनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. त्यात शिवसेनेने अपक्ष आमदारांसह स्वपक्षीय आमदारांना वर्षावर बोलावलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.