मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत भाजपाचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे. त्यात शिवसेनेकडून ज्या मित्रपक्षांच्या विश्वासावर दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाच्या हालचाली सुरू होत्या, त्यालाच आता मोठा धक्का बसताना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी सेफ गेम खेळण्याची तयारी काँग्रेसने केली असून, आपला एकमेवर उमेदवार निवडून आणण्यावर काँग्रेसचा भर असेल.
काँग्रेसने राज्यसभेमध्ये इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ४४ आमदार असून, विजयी होण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराला आवश्यक ४२ मते दिल्यानंतर काँग्रेसकडे अतिरिक्त दोन मतं उरतात. मात्र निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून ४२ मतांऐवजी आपल्या उमेदवाराला ४४ मतांचा सुरक्षित कोटा देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे काँग्रेसची दोन अतिरिक्त मतं शिवसेना उमेदवाराच्या खात्यात जाण्याची शक्यता फार कमी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची बेगमी करताना शिवसेनेची दमछाक होण्याची शक्यता आहे.
सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित १६ मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं असून, अन्य ७ आमदारांचा पाठिंबा धरता एकूण २९ मते आहेत. उर्वरित १३ मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे.