ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांना पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्याजागी जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राकेश मारियांना ३० सप्टेंबररोजी बढती मिळणे अपेक्षीत असताना २० दिवसांपूर्वीच त्यांची बढती देण्यात आल्याने पोलिस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुन्ह्यांचा शिताफीने तपास करणारे व आयुक्तपदावर असतानाही थेट रस्त्यावर उतरुन पोलिस दलाचे मनोबल वाढवणारे राकेश मारिया यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या शीना बोरा हत्या प्रकरण उलगडले होते. ३० सप्टेंबररोजी राकेश मारियांचा कार्यकाळ संपणार होता. त्यानंतरच मारियांना बढती मिळणे अपेक्षीत होते. बढती मिळण्यापूर्वी या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी मारिया व त्यांची टीम अथक मेहनत घेत होती. मात्र आज (मंगळवारी) जपान दौ-यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारियांना बढती देण्याचा निर्णय घेतला. होमगार्डच्या पोलिस महासंचलकपदावर राकेश मारियांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.
पारदर्शी कारभार व महिला सुरक्षेवर भर देणार
मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होताच मंगळवारी दुपारी जावेद अहमद यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. राकेश मारियांची बदली व शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास यांचा काहीच संबंध नसावा असे जावेद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणाचा तपास करणा-या अन्य अधिका-यांची बदली केली जाणार नाही, याप्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु असून पुढेही तो असाच सुरु राहील असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई पोलिसांचा कारभार पारदर्शी करण्यासोबतच महिला व मुलांच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जावेद अहमद यांची कारकिर्द
जावेद अहमद हे १९८० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी मुंबईत अतिरिक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय नवी मुंबईत पोलिस आयुक्तपदी कार्यरत असताना जावेद अहमद यांनी महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरु केली होती. तसेच स्वतःचा मोबाईल नंबरही जनतेला देत तक्रार असल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहन केले होते. जावेद यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.