ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 17 - राजमाची पाँईट परिसरात वर्षानुवर्षे टपरी व हातगाडी व्यावसाय करत जीवन जगणार्या व्यावसायिकांना धनशक्तीच्या जोरावर धमकावत तसेच शासकीय अधिकारी यांना हाताशी धरत दडपशाहीचा वापर करून त्रास देत त्यांचा व्यवसाय बंद करायला लावणारे अभिनेते राकेश रोशन व हॉटेल व्यावसायिक जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार टपरी हातगाडी व्यावसायिकांना परवाने व जागा मोजून द्या, या मागणीसाठी आज टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अमृतांजन पॉइंटजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्हार कांबळे, महाराष्ट्र सचिव प्रल्हाद कांबळे, लोणावळा अध्यक्ष गणेश चव्हाण, तळेगाव अध्यक्ष किरण साळवे, शाखा अध्यक्ष संदीप रोकडे, महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई सूर्यवंशी यांच्यासह व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते.राजमाची पॉइंटसमोरील जागा अभिनेते राकेश रोशन यांनी विकत घेतली आहे. या जागेच्या समोर व जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या विरुद्ध बाजूला मागील काही वर्षांपासून स्थानिक नागरिक टपरी व हातगाडी व्यावसाय करतात. मात्र आपल्या जागेसमोर हातगाड्या व टपर्या उभ्या राहत असल्याने राकेश रोशन व जी. एस. बावा यांनी आयआरबीचे व एमएसआरडीसीचे अधिकारी यांना हाताशी धरून आम्हाला दमदाटी करत आमच्या टपर्या व हातगाड्यांचे नुकसान केले. बावा हे लाल दिव्याच्या गाडीतून येऊन आम्हाला दमदाटी करतात, असा या व्यावसायिकांचा आरोप आहे. राजमाची पॉइंट हा उंच भिंत बांधत बंद करण्याचा कुटील डाव अधिकारी व गोरगरिबांना त्रास देणार्यांनी आखला असल्याने सदरहू भिंतीचे काम तातडीने बंद करा, अशी मागणी देखील संघटनेने यावेळी केली. अतिक्रमणांच्या नावाखाली टपरी व हातगाडी व्यवसायिकांवर कारवाई करणारे अधिकारी धनिकांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत आहेत. लाल दिव्याच्या गाडीतून येऊन टपरी व्यावसायिकांना धमकाविणारे जी. एस. बावा यांच्या बंगल्याचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण आहे. राकेश रोशन यांची संरक्षण भिंत हे रस्त्यात अतिक्रमण आहे. लोणावळा व खंडाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांचा विळखा वाढत असताना अधिकारी मात्र गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यात धन्यता मानत आहेत, असा आरोप हातगाडी, पथारी व टपरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्हार कांबळे यांनी केला.
राकेश रोशन व जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा
By admin | Published: April 17, 2017 8:31 PM