पारोळ : जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्यात मरण पावलेल्या वसईच्या राकेश तलरेजा या तरूणाचे पार्थीव शरीर ब्रिटीश एअरवेजच्या बी ए १९९ या विमानाने बुधवारी सकाळी ११.३० वाजता मुंबई येथे आणले जाणार आहे. त्यानंतर ते वसईतील त्याच्या घरी नेले जाईल.गुरूवारी रात्री जमैका येथे राकेश व त्याच्या दोन मित्रांवर अज्ञात हल्लेखोरांनी लूटमार करण्यासाठी गोळीबार केला होता.त्यात राकेशला तीन गोळ्या लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. इतर दोन जणांवर तेथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.राकेशचा मृतदेह मायदेशी अंत्यसंस्कारासाठी आणण्यासाठी बराच कालावधी लागणार होता. राकेशचे पार्थीव त्याच्या नातलगांना अंत्यसंस्कारासाठी लवकरात लवकर मिळावा यासाठी वसई-विरारच्या महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क केला होता.मृतदेह हस्तांतरण करण्याचे सोपस्कार लवकर पूर्ण करण्यात यावेत म्हणून वरिष्ठ पातळीवर हालचाल करावी अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर जमैकाचे पंतप्रधान अँण्ड्रीव्ह हॉलनेस यांनी जमैका प्रशासनाला पोस्टमार्टेम व इतर सोपस्कार तत्काळ करण्यात यावे म्हणून आदेश दिले होते. (वार्ताहर)
राकेश तलरेजाचे पार्थीव बुधवारी वसईत
By admin | Published: February 15, 2017 4:26 AM