पारोळ : वसईतील राकेश तलरेजा याचा जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे गुरूवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर त्याचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी वसई-विरार महापालिका महापौर प्रविणा ठाकूर यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क केल्यानंतर जमैकाच्या पंतप्रधानांनी त्याचा मृतदेह १४ फेब्रुवारीला भारतात पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.महापौरांच्या प्रयत्नानंतर याप्रकरणी सुषमा स्वराज यांनी जमैकाचे पंतप्रधान अँण्डू हॉलनेस यांच्याशी संपर्क करून राकेशच्या मृतदेहाचे शासकीय सोपस्कार लवकरात लवकर पुर्ण करून, मृतदेह भारतात पाठवण्यात यावा अशी विनंती केली होती. पंतप्रधान हॉलनेस यांनीही तात्काळ जमैका प्रशासनाला पोस्टमार्टेम व इतर सोपस्कार लवकर पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राकेशचा मृतदेह मंगळवारी भारतात आणण्यात येणार आहे. त्यानंतर तलरेजा कुटुंबीयांच्या हवाली मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात येणार आहे. सुषमा स्वराज यांनी याबाबत ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आहे. तलरेजा कुंटुबाबाबत झालेली घटना दुदैवी असून त्यांच्या दु:खा मध्ये सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, वसईच्या महापौर प्रविणा ठाकूर यांनी राकेशच्या वसईतील निवासस्थानी जाऊन तलरेजा कुटूंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नारायण मानकर, जेष्ट कार्यकर्ते प्रविण राऊत, परिवहन सभापती भरत गुप्ता, नगरसेवक उमा पाटील, नगरसेवक राजू कांबली, छोटू आनंद आदी उपस्थीत होते. (वार्ताहर)
राकेशचा मृतदेह मंगळवारी मायदेशी
By admin | Published: February 13, 2017 4:44 AM