- तेजस टवलारकर- पुणे : बहिण-भावाच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणारा सण राखीपौर्णिमा दोन दिवसांवर आला असून, विविध आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या राख्या आपल्या भावाला पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बहिणींनी गर्दी केली आहे. पावसात ही राखी भिजू नये म्हणून खास वॉटर प्रुफ लिफाफा उपलब्ध केले आहेत. शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये राख्या पाठविण्यासाठी रांगा लागल्या आहेत. रविवार आणि सोमवार दोन दिवस सुट्टी होती. त्यामुळे मंगळवारी गर्दी वाढलेली दिसून आली. राखी वेळेत पोहचावी यासाठी बहिणींची धावपळ सुरू आहे. भावांचीही बहिणीला भेट वस्तू देण्यासाठी धावपळ सुरू आहे. भावांनी देखील पोस्ट ऑफिसमध्ये बहिणीला भेट वस्तू पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. सध्या पावसाळा असल्याने बहिणीने पाठविलेली राखी भिजून नये, म्हणून टपाल विभागाकडून ‘वॉटर प्रुफ’ लिफाफा तयार केला आहे. पावसामध्येसुद्धा या लिफाफ्यामधून राखी सुरक्षित भावापर्यंत पोहोचणार आहे. तसेच रक्षाबंधनापूर्वी बहिणीला तिच्या भावापर्यंत राखी पोहचावी यासाठी राख्यांच्या लिफाफ्यांना प्राधान्य दिले जात आहे. .................................................................................................. राखीपौर्णिमेचा सण दोन दिवसांवर आल्यामुळे टपाल कार्यालयात गर्दी वाढली आहे. पावसात राख्या खराब होऊ नये यासाठी 'वॉटरप्रुफ' लिफाफ्याची सोय केली आहे. राखी लवकर पोहचावी, याला प्राधान्य दिले जात आहे. पोस्ट मास्तर, नवसह्याद्री पोस्ट ऑफिस, कर्वेनगर ...................................................................................राखीपौर्णिमेला घरी पोहचू शकत नाही. म्हणून पोस्टाच्या माध्यमातून राखी पाठवत आहे. मी दीड तास रांगेत उभे राहिल्यावर राखी पाठविण्यासाठी माझा नंबर आला. - शिवानी चव्हाण
‘वॉटर प्रुफ’ लिफाफ्यातून भावाकडे पोचणार राखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 5:05 PM