लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: रविवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना कल्याण शहरालगतच्या आदिवासी पाडयात मात्र अनोख्या पध्दतीने हा सण साजरा करण्यात आला. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे आणि पर्यावरणासोबत सामाजिक रक्षणाची जबाबदारी आपलीच असल्याचा स्विकार करीत वाडेघर-सापार्डे येथील पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील महिलांनी आणि मुला-मुलींनी झाडांना ओवाळुन राख्या बांधत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
अनुबंध संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. अनुबंध ही संस्था पाणबुडे नगर या आदिवासी वस्तीतील मुलांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या अन्य विकासासाठी काम करते. नुकत्याच झालेल्या पर्यावरणदिनाला या आदिवासी वस्तीत चाळीस ते पन्नास झाड लावण्यात आली आहेत त्या झाडांचे पालकत्व तेथील मुलांनी स्विकारले आहे. आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणो ही आदिवासी मुले या झाडांचा सांभाळ करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारचा रक्षाबंधनाचा सणही येथील आदिवासी बांधवांनी या झाडांसोबत साजरा केला. ज्याप्रमाणो बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते आणि मग राखी बांधते अगदी त्याचप्रमाणो आदिवासी महिला आणि मुली- मुलांनी झाडांना ओवाळून राख्या बांधल्या. बहीण -भावाच्या या नात्याबरोबरच आजच्याघडीला पर्यावरणाचे रक्षण करणो ही देखील काळाची गरज बनली आहे.
पर्यावरणासोबत सामाजिक रक्षणाची जबाबदारीही आपलीच असून रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याचा स्विकार केल्याचे या आदिवासी बांधवांनी सांगितले. तर आजचा सण हा केवळ राखी बांधण्यापुरता सिमित न राहता मुलींचे शिक्षण, त्यांची सुरक्षितता, बाल विवाह, मारझोड या सर्वांपासूनही त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे अनुबंध संस्थेचे विशाल जाधव यांनी सांगितले. दरम्यान सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, बाळा शिंदे, वैभव देशमुख, नचिकेत कुलकर्णी, प्रभाकर घुले, राहुल साबळे यांच्यासह वस्तीतील इतर सर्वजणांनी हा अनोखा उपक्रम यशस्वी केला.