पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात सत्तांतर झाले आहे. माजी सरपंच दिवंगत गणपत औटी यांचा मुलगा लाभेष औटी यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या फळीने विद्यमान सरपंच जयसिंग मापारी गटाला पराभवाचा धक्का दिला. विद्यमान सत्ताधाऱ्यांपैकी एकटे मापारी विजयी झाले. शुक्रवारी सकाळी पूर्वनियोजनाप्रमाणे पराभूत गटाने विजयी गटातील सदस्यांचा सत्कार करत गावविकासाला चालना देण्याचा संकल्प केला.लोकशाहीचा हक्क वापरला, तसेच अत्यंत शांततेत व खेळीमेळीने निवडणूक केल्याबद्दल शुक्रवारी अण्णांनी सर्व गावकऱ्यांना मिष्टान्नभोजन दिले. लोकशाहीवरील विश्वास उत्तरोत्तर दृढ होत जावा, अशी अपेक्षा अण्णांनी व्यक्त केली. राळेगणमध्ये ९ जागांसाठी निवडणूक झाली. पहिल्या टप्प्यात निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रस्ताव समोर आला होता. गेल्या काही वर्षापासून मापारी यांच्या नेतृत्वात कारभार सुरु होता. मात्र यंदा निवडणूक व्हावी, अशी तरुणांची इच्छा होती. त्यानंतर सर्वानुमते निवडणूक घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. दोन्ही पॅनलने एकाच दिवशी अण्णा हजारेंचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला होता. प्रचार वैध मार्गाने व्हावा, आमिष दाखविले जाऊ नये, दबाव आणू नये अशा सूचना अण्णांनी दोन्ही गटांना दिल्या होत्या. तसेच कोणत्याही गटावर दबाव येऊ नये, यासाठी गावातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अण्णा मतदानाच्या दिवशी दुपारी गावात परतले होते. लाभेष औटी व रमेश औटी यांच्या नेतृत्वात सुरेश पठारे यांच्यासह गावातील तरुण एकत्र आले होते. त्यांच्या ग्रामसमृध्दी मंडळाने नऊ पैकी आठ जागा जिंकला. (प्रतिनिधी)
राळेगणमध्ये सत्तांतर, तरुणांवर विश्वास !
By admin | Published: August 08, 2015 1:19 AM