पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या धमक्यांचा पोलिसांनी तातडीने तपास करावा आणि त्यांना कडक शासन करावे, या प्रमुख मागणीसाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थांच्या वतीने गुवारी पारनेर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.पारनेर येथील महात्मा फुले पुतळ्यासमोरून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य लाल चौक, छत्रपती शिवाजी पेठ, भैरवनाथ मंदिरमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. अण्णा हजारे यांना गेल्या एक ते दोन वर्षांपासून पत्राद्वारे व विविध प्रकारे जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबाबत पारनेर पोलिसांनी अद्याप कोणत्याच प्रकरणाचा तपास लावलेला नाही, असे या वेळी निदर्शनास आणून देण्यात आले.आ. विजय औटी म्हणाले, प्रत्येकाचे संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. चळवळीचे नेते अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमक्यांचा शोध लावण्याची गरज आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे म्हणाले, या धमक्यांचा तपास लागत नाही, ही खेदाची बाब आहे. (प्रतिनिधी)
राळेगणसिद्धी ग्रामस्थांचा मोर्चा
By admin | Published: February 05, 2016 4:04 AM