विधानसभा निवडणुकीत पुरकेंची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 03:17 PM2019-07-18T15:17:30+5:302019-07-18T15:29:48+5:30
चार वेळा आमदार राहिलेले आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या पुरके यांच्यासाठी विधानसभा निवडणूक अस्तित्त्वाची ठरणार आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. युती आणि आघाडी यांच्यातील जागावाटपाचा पेच अजूनही कायम आहे. असे असली तरीही मात्र, युतीकडून भाजपचे विद्यमान आमदार अशोक उईके यांची तर, काँग्रेसकडून माजी आमदार वसंत पुरके यांना प्रबळ दावेदार समजले जात आहे. त्यामुळे मागच्यावेळी पराभव स्वीकरावा लागलेल्या पुरके यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राळेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातासाठी राखीव आहे. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमदेवार भावना गवळी यांच्यासाठी राळेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक उईके यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. तर या निवडणुकीत राळेगाव मतदारसंघातून भावना गवळी यांनी २८ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली. त्यामुळेच आमदार उईके यांची उमदेवारी निश्चित मानली जात आहे.
त्याचप्रमाणे काँग्रेसकडून वसंत पुरके यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे. २०१४ प्रमाणेच यावेळी सुद्धा उईके विरोधात पुरके असा सामना पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक उईके यांनी पुरके यांचा तब्बल ३६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यामुळे चार वेळा आमदार राहिलेले आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या पुरके यांच्यासाठी विधानसभा निवडणूक अस्तित्त्वाची ठरणार आहे.
त्यातच राळेगाव मतदारसंघात प्रवीण देशमुख यांचा गट महत्वाचा समजला जातो. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशमुखांसह त्यांचा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर देशमुख यांना पक्षात प्रवेश दिला जाऊ नये म्हणून, पुरके यांनी प्रयत्न केले होते. मात्र, माणिकराव ठाकरे यांच्या पुढाकाराने देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. पण पुरके विरुद्ध देशमुख असा वाद पुढे कायम पहायला मिळाला आहे. त्यामुळे पुरकेंना विधानसभेत विरोधकांबरोबरच पक्षातील विरोधकांचा सुद्धा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.