ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 13- 14 हजारांची लाच घेताना वाईतील भाजपच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना रंगेहाथ पडकण्यात आलं होतं. यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीकृत तीर्थक्षेत्र आघाडीच्यावतीने मंगळवारी सकाळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. महागणपती घाटावरून किसनवीर चौक, मारवाडी गल्ली आणि भाजी मंडईवरून हा मोर्चा नगरपालिकेत आला. या ठिकाणी निषेध सभा झाली. वक्त्यांनी आपल्या भाषणात नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत, सर्व नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यासह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाई पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी भाजपच्या चिन्हावर डॉ. प्रतिभा शिंदे अवघ्या एक मतानं थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे शिक्षक पती सुधीर शिंदे यांना 10 जून रोजी ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
आणखी वाचा
वाईच्या भाजपा नगराध्यक्षांना लाच घेताना अटक
संबंधित ठेकेदाराने वाईमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामं केली होती. त्या कामाचे १ लाख ४० हजार बिल काढण्यात आले होते. त्या काढलेल्या बिलाच्या मोबदल्यात तसंच उर्वरित कामाच्या ८ लाखांचं प्रलंबित बिल काढण्यासाठी दहा टक्के प्रमाणे १४ हजार रुपयांची मागणी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ठेकेदाराकडे केली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार नोंदविली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
प्रतिभा शिंदे यांचा पती सुधीर शिंदे यांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये संबंधित ठेकेदाराला पैसे घेऊन बोलावले होते. या वेळी स्वत: नगराध्यक्ष प्रतिभा शिंदेही तेथे हजर होत्या. संबंधित ठेकेदाराने १४ हजारांची रोकड सुधीर शिंदे यांच्या हातात देताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. तर लाचेची मागणी केल्यामुळे प्रतिभा शिंदे यांनाही तत्काळ अटक करण्यात आली.
शिंदे या पेशाने डॉक्टर असून, केवळ एक मताने भाजपाकडून थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, वाई नगरपालिकेत विरोधी राष्ट्रवादीच्या आघाडीची सत्ता आहे. त्यांचे पती द्रविड हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आणखी वाचा
नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचा पालिकेत गोंधळ