मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असताना आपापली कामे करवून घेण्यासाठी मंत्रलयात सध्या उदंड गर्दी होत आहे. आताच झाले तर काम होईल, एकदा आचारसंहिता लागली की काही खरे नाही, असे मंत्रलयात आलेले लोक बोलून दाखवितात.
विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्याची गर्दी वाढली आहे. अनेक कार्यकर्ते कामे घेऊन मंत्र्यांच्या दालनात गर्दी करतात. आमचे सरकार आहे तोवर काम झाले पाहिजे, असे काही जण बोलतात. सरकार आमचेच येणार आहे पण आचारसंहितेच्या पूर्वी कामे हमखास होतात, त्यामुळे आलो आहोत, असे काही जण सांगतात.
नियमात बसणारी अन् न बसणारी कामे घेऊन येणा:यांची संख्या जवळपास सारखी आहे. त्यामुळे काही विभागांमध्ये ‘अर्थ’पूर्ण हालचाली वाढल्या आहेत. नको ती कामे किंवा जी होणोच शक्य नाही अशी कामे घेऊन येणा:यांच्या त्रसापायी काही मंत्री मंत्रलयात येण्याचे शक्यतो टाळत आहेत. आपल्या शासकीय बंगल्यांवरूनच ते कामकाज करतात. निवडणुकीच्या तोंडावर सरकार दबावाखाली येऊन आपल्या बाजूने निर्णय घेईल, असा कयास बांधून विविध कर्मचारी संघटनांचे नेते मंत्रलयात फिरताना दिसतात. या शिवाय, कामांची बिले काढून घेण्यासाठी आलेल्या कंत्रटदारांचीही गर्दी पाहायला मिळते.
मंत्रलयात अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे अधिकारी, कर्मचारी मात्र त्रस्त आहेत. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्याची घाई झालेले मंत्री प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्याचा धडाका लावत आहेत. त्यात सहकार, आदिवासी विकास, सामाजिक न्याय हे विभाग आघाडीवर आहेत. (विशेष प्रतिनिधी)