ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि.18 - मुस्लिम समाजाला राज्य शासनाने पाच टक्के आरक्षणाची निश्चिती केली होती़ न्यायालयानेही हे आरक्षण वैध ठरवले होते. मात्र या अध्यादेशाची कालमर्यादा संपूनही शासन मुस्लिम समाजाला आरक्षण देत नाही, हा अध्यादेश तात्काळ लागू केला जावा, या मागणीसाठी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.शहरातील इलाही चौकातून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली़. मोर्चाची वेळ ११ वाजेची असली तरी, याठिकाणी आठ वाजेपासून दोन-दोनच्या रांगेत युवक व नागरिक मोर्चात सहभागी होण्यासाठी येत होते. नंदुरबार शहरातील मुस्लिम समाजबांधव स्वच्छेने येऊन रांगेत जागा घेत होते. ईलाही चौक ते मच्छीबाजार या दरम्यान मोठी रांग लावण्यात आली होती़. जमात-उलेमा-ए-ंिहंद व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. एक तास सुरू असलेल्या या मोर्चात कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता, केवळ मूकपणे मागण्यांचे फलक युवक दाखवत होते़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित जमाए-उलेमा-ए-हिंद या संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मौलाना जकेरिया रहेमानी यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी जमात-उलेमा-ए-हिंद या संघटनेने राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर तालुकास्तराव धरणे आंदोलन करण्यात आले होते. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नंदुरबारात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 5:33 PM