पनवेल : अपंग क्रांती संघटनेतर्फेजनजागृती मोहीम शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. महापालिका क्षेत्रात वास्तव्य करत असलेल्या सर्व अपंगांना शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच त्यांना एकत्र आणण्यासाठी योग्य त्या सूचना करणे, समाजात अपंगांचे हक्क व अस्तित्व निर्माण करणे यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. आंबेडकर पुतळा येथून सकाळी १0 वाजता निघालेली ही रॅली शिवाजी चौक, फडके नाट्यगृह, बस स्थानक, नवीन पनवेल रेल्वे स्थानक, खांदा वसाहत आदी परिसरातून मार्गस्थ झाली. महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत शेकडो अपंग बांधव यात सहभागी झाले होते. केंद्र सरकार व राज्य सरकार अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते, मात्र या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप रॅलीत सहभागी झालेल्यांकडून करण्यात आला. पनवेल नगरपालिका असताना अपंगांना न्याय मिळाला नाही. ३ टक्के निधीसाठी ४ ते ५ आंदोलने केल्यावर २०१५-१६ या वर्षाचा निधी मिळाला. परंतु अद्यापही निम्मा निधी तसाच पडून असल्याचे दीपक घाग यांनी सांगितले. तर २०१६-१७ या वर्षातील निधी मार्च महिना उजाडला तरीही वितरीत करण्यात आलेला नाही, हा निधी पालिकेने त्वरित द्यावा, अशी मागणी अपंग क्रांती सेनेने केली आहे. आज जनजागृती रॅली काढली असून अन्यायाची दखल घेतली नाही तर १५ मार्चपासून महापालिकेबाहेर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
न्याय हक्कांसाठी अपंग बांधवांची पनवेलमध्ये रॅली
By admin | Published: March 04, 2017 2:54 AM