५२ वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. माझा मुलगा योगेश कदम राष्ट्रवादीसोबत गेला होता. त्याला आम्ही खेचून आणले. होय एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाचविली. मी एकनाथ शिंदेंसोबत राज्यभर फिरणार, सभा घेणार, बैठका घेणार, पण उद्धव ठाकरेंवर टीका होऊ देणार नाही. जे शरद पवार, अजित पवारांना हवेय ते होऊ देणार नाही, असे आव्हान रामदास कदम यांनी राष्ट्रवादीला दिले आहे.
योगेश कदम याची कुचंबणा सुरु होती. वर्षावर जेव्हा बैठक झाली तेव्हा योगेश तिथे होता. त्याची सही आहे. परंतू, नंतर आम्ही घरी एकत्र बसलो. बायको, मुलगी सारे, पुष्कळ विचार केला तेव्हा त्याला शिंदे गटासोबत जाण्याची परवानगी दिली. आज सर्व गोष्टी बोलणार नाही. मला जे तुटलेय ते जोडायचे आहे, असे रामदास कदम म्हणाले. जेव्हा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करत होते, तेव्हा मी शेवटचा मातोश्रीवर गेलो. उद्धव ठाकरेंना हे पाप आहे, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करू नका, असे सांगितलेले. त्यानंतर पावणे तीन वर्षे झाली मी मातोश्रीवर गेलो नाही, असेही कदम म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी माझी हकालपट्टी केली. कोणाच्या सांगण्यावरून? त्यांच्या आजुबाजुला जी लोकं आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्यांना हाकलले पाहिजे. मी सांगतो मीच तुम्हाला मनातून काढून टाकले. उद्धव ठाकरेंकडे मी सहा महिने वेळ मागत होतो, मला दिला गेला नाही. भेटले नाहीत. बाळासाहेब साधे नव्हते, उद्धव ठाकरे तुम्ही साधे निघालात. तुम्हाला शरद पवारांनी फसविले, असा आरोप कदम यांनी केला.
“आज शिवसेना प्रमुख असते तर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमत्री होऊ दिलं असतं का? हे तुमच्या मनाला विचारून पाहा. बाळासाहेबांनी आपल्यासाठी कोणतंही पद घेतलं नाही. तुम्ही विचारसरणी बदललीत. आपला पक्ष वाढवून आमदार निवडून तुम्ही मुख्यमंत्रिपदी बसला असता तर आनंद झाला असता. भाजपनं २५ आपल्याला सडवली म्हणता, त्यांना २५ वर्ष लागली, पण यांनी अडीच वर्षात आपली वाट लावून टाकली त्याचं काय?,” असा सवाल रामदास कदम यांनी केला.
शिवसेनेसाठी दिलेलं योगदान आणि आज द्यावा लागलेला राजीनामा याबाबत बोलताना रामदास कदम प्रचंड भावूक झालेले पाहायला मिळाले. "आमचं काय चुकलं? पक्षासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या. ज्या व्यक्तीनं पक्षासाठी ५२ वर्ष खर्च केली. त्याला आज राजीनामा देण्याची वेळ येते. रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांना संपवून १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ५१ आमदारांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढील निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते. महाराष्ट्राचा खजिना अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी लुटला. प्रशासकीय अनुभव नसल्याने उद्धव ठाकरेंना फसवलं. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा. बेईमानी आमच्या रक्तात नाही. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे असं त्यांनी सांगितले.