अतुल कुलकर्णी,
मुंबई- कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेले शेतकरी, आत्महत्यांचे न संपणारे सत्र असे चित्र एकीकडे असताना , दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचारीची वाणवा आहे. आजमितीला अ, ब, क आणि ड या चार संवर्गातील मिळून तब्बल ७४११ जागा रिक्त आहेत. यातील तब्बल १५०८ जागा पदोन्नती अभावी रिक्त आहेत, तर निवृत झालेले आणि आजारी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ८ हजाराहून अधिक जागा भरल्या गेलेल्या नाहीत.राज्यात कृषीसंचालकांच्या ५ जागा आहेत, त्यापैकी ४ जागा रिक्त आहेत. कृषी सहसंचालकांच्या १४ पैकी ५ जागा रिक्त आहेत. वरिष्ठ पदावरील खुर्च्या रिकाम्या असल्याने खालून वरपर्यंत येणाऱ्या फाईल किती गतीने हलत असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गट अ संवर्गातील २८, ब संवर्गातील ७९२ तर गट क संवर्गातील ४९९५ आणि ड संवर्गातील १५९६ जागा रिकाम्या आहेत. या ७४११ पैकी ५९०३ जागा सरळसेवेने भरवयाच्या आहेत. मात्र, त्यासाठी अद्याप भरती प्रक्रियाच सुरू झालेली नाही.शेतीच्या कामासाठी महत्वाची असणारी अधिक्षक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आरेखक, अनुरेखक, माळी अशी महत्वाची पदे देखील शेकडोंनी रिक्त आहेत. सरकारने एखाद्या कृषी योजनेचा आढावा घ्यायचे ठरवले किंवा शेतकऱ्यांपर्यंत नवीन योजना पोहोचविण्याचे ठरवले तरी देखील आज मितीला सरकारकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनशेतकऱ्यांना ज्ञान देण्याची कोणतीही योजना आज सरकारजवळ नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना ‘राम भरोसे’ सोडण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.