मुंबई : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड राज्यभरात होत असलेल्या विविध आंदोलनात सहभागी होऊन भाजप आणि केंद्रसरकार निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका आंदोलनाच्या सभेत बोलताना त्यांनी 'हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नसल्याचे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाच्या मुद्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आपल्या भाषणात बोलताना आव्हाड म्हणाले होते की, ‘हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही. मात्र मुस्लिम सांगू शकतो, कारण त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे. आव्हाडांच्या या विधानावर राम कदम यांनी टीका केली आहे. आव्हाडांनी हे वक्तव्य मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी केले आहे. त्यातून केवळ हिंदू धर्म नव्हे, तर मुस्लिम समाजसोडून ज्या-ज्या धर्मामध्ये अंत्यविधी दफनविधीचा होत नाही, त्या धर्मांचा अपमान केला आहे, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.
दरम्यान त्यांनी याच मुद्यावरून शिवसेनेवर सुद्धा टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दिवसाढवळ्या हिंदूंचा अपमान करतो आणि बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भाषा करणारी शिवसेना गप्पा का? असा सवाल त्यांनी ठाकरेंना विचारला. तर बाळासाहेब जिंवत असते, तर त्यांनी हे खपवून घेतले नसते, असेही राम कदम यावेळी म्हणाले.