मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्र मासिकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयीच्या दोन लेखांवरून काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. तर यावरूनच भाजपचे नेते राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून याचवेळी शिवसेनेवर सुद्धा टीका केली आहे.
राम कदम म्हणाले की, काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्र मासिकेत सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी तात्काळ याविषयी देशाची माफी मागावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
तर याचवेळी शिवसेनेवर निशाणा साधताना ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचा अपमान झाला, महराजांच्या वंशजांचा अपमान झाला आणि सावरकरांचा वेळोवेळी अपमान होत असताना सुद्धा शिवसेना शांत आहे. शिवसना ही सत्तेसाठी लाचार झाली असून त्यांना यासर्व गोष्टींचा विसर पडत असल्याचे कदम म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर त्यांनी शिवाजी महाराजांचा आणि सावरकरांचा अपमान सहन केला असता ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर आत्ताची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची असूच शकत नसल्याचा टोलाही यावेळी कदम यांनी लगावला.