Ram Mandir: काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं; 'खदखदणारा हिंदूद्वेष' म्हणत भाजपाची सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 06:55 PM2024-01-10T18:55:32+5:302024-01-10T18:55:55+5:30
ram mandir ayodhya photo: २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे.
२२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. यावरून राजकारण देखील चांगलेच तापले असून, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले आहे. पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश आज एक पत्रक काढत म्हणाले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. प्रभू रामाची आपल्या देशात लाखो लोक पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. पण राम मंदिराचे उद्घाटन भाजपा आणि आरएसएसच्या नेत्यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढे आणले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
भाजपाची सडकून टीका
काँग्रेसने निमंत्रणाला नकार देताच भाजपाने टीका केली. भाजपा महाराष्ट्र या सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले. भाजपाने पोस्टच्या माध्यमातून म्हटले, "जो राम का नही वो किसी काम का नही… आज काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण नाकारून पुन्हा एकदा त्यांच्या मनात खदखदणारा हिंदूद्वेष सिध्द केला. जनतेच्या मनातला राम यांना कधीच कळला नव्हता. विकासात त्यांना राम कधी गवसला नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली इंग्रजांचा 'तोडा आणि राज्य करा' हा मंत्र गेली ७ दशकं जपत आहेत. पण भारत बदलतोय. आमची शबनम शेख स्वतः रामललाच्या दर्शनासाठी मैलोमैल चालत आयोध्येत पोहचतेय. आणि तुम्ही अजूनही आमच्या देशाचं आराध्य असलेल्या श्रीरामांना स्वीकारण्याचं औदार्य दाखवू शकत नाही."
'जो राम का नही वो किसी काम का नही…'
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 10, 2024
आज काँग्रेसने आयोध्देतील राम मंदिराचं उद्धाटनाचं आमंत्रण नाकारून पुन्हा एकदा त्यांच्या मनात खदखदणारा हिंदूव्देष सिध्द केला.
जनतेच्या मनातला राम यांना कधीच कळला नव्हता. विकासात त्यांना राम कधी गवसला नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली… pic.twitter.com/H0ENVMMJSl
दरम्यान, अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिर उभारणीचा देशभरात उत्साह असून भाविकांचे डोळे अयोध्येकडे लागले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ७ लाख भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, सेलिब्रिटीही सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. तर, संत, महात्मा आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी संघर्ष करणारे कारसेवकही या सोहळ्यासाठी अयोध्येत येत आहेत.