मी ५० हजार लोक घेऊन तिथं येतो, मग बघू...; नाना पटोलेंचा राहुल गांधींना निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:31 PM2024-01-22T17:31:27+5:302024-01-22T17:40:01+5:30
प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली.
मुंबई - आपल्या देशात धर्माच्या नावानं राजकारण सुरू आहे. रामाचं नाव घ्यायचे अन् दुसरीकडे द्वेष पसरवायचा याचा आम्ही निषेध करतो. आसाममध्ये राहुल गांधी मंदिरात दर्शन करण्यासाठी जाताना त्यांना प्रवेश नाकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात दर्शन नाकारणारी प्रवृत्ती सत्तेत आलेत का असा प्रश्न उभा राहतो. भगवान श्री रामाने अहिंसेचा मार्ग आम्हाला शिकवला. परंतु भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला. तो माज उतरवल्याशिवाय देशातील जनता स्वस्थ बसणार नाही असा निशाणा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींच्या यात्रेला आसाममध्ये रोखण्याचे काम केले जात आहे. मंदिरात जाण्यापासून राहुल गांधींना रोखले गेले. यात्रेच्या वाहनावर दगडफेक करणे, मारहाण करणे हे भगवान श्री रामानं शिकवले का?. आमच्या नेत्यांना मी म्हणालो तुम्ही आवाहन करा, चलो आसाम, मग कुठले मुख्यमंत्री, पंतप्रधान काय करतात ते बघू. तुम्हाला अडवलं तर आम्ही येतो, महाराष्ट्रातून मी ५० हजार लोक घेऊन येतो, देशातून असे लोक तिथे गेले तर काय होईल बघू, मी माझा विचार राहुल गांधींसमोर मांडला. तेव्हा आपल्याला अहिंसेच्या मार्गातून जायचे आहे. कुठलाही उद्रेक नको. आपण अहिंसा, प्रेमाने जनतेला जिंकायचे. सत्याच्या मार्गाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत करण्यात आले. त्याचा गाजावाजा केला नाही. अयोध्येतील मंदिराबाबत शंकराचार्यांनी विरोध केला. मात्र हे धर्मापेक्षा आणि शंकराचार्यापेक्षा मोठे झाले आहेत. भाजपाला काय उत्सव साजरा करायचा हा अधिकार त्यांचा आहे. भगवान श्रीरामाला लहान आणि मोदींना मोठे करायचे असेल तर काय बोलणार. भगवान श्री रामाला भाजपा लहान मानायला लागले आहेत. भाजपाच्या गर्वाचे हरण आज ना उद्या होणारच आहे. राजीव गांधी यांनी राम मंदिराचा ताळा उघडला होता. त्यांनीच पूजा केली. मात्र कारसेवक, मुस्लीमांचे रक्त भाजपाने वाहिले. जो उद्रेक भाजपाने केला, ज्यांचे जीव गेले त्यांचे काय?. हिंदू शंकराचार्य हे भाजपावर टीका करतायेत. अशा शंकराचार्यांवर भाजपा टीका करते. प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली.
दरम्यान, रामनाम जपायचे अन् पैसे लुटायचे हे भाजपाचे काम आहे. लोकांकडून लुटलेले पैसे मूठभर मित्रांकडे पाठवले जातात. अपूर्ण मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. शंकराचार्यांनी हे करू नये अशी भूमिका घेतली. पण भाजपाने राजकीय फायद्यासाठी हा इव्हेंट घेतला. त्यामुळे निमंत्रण मिळूनही अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला. अहंमपणा रामाने शिकवला नाही. अहंमपणाचा नाश रामाने केला असं नाना पटोले यांनी म्हटलं.