औरंगाबाद – अयोध्येत प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत शिलान्यास करुन भूमीपूजन सोहळा संपन्न झाला, या सोहळ्यासाठी अनेक साधू-संत, रामभक्त अयोध्येत जमले होते, सरसंघचालक मोहन भागवत यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. अनेक वर्षाच्या संघर्षातून हा दिवस पाहायला मिळाला अशी भावना यावेळी नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.
अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याला कोरोनामुळे अनेकांना जाता आलं नाही, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी रामभक्तांनी हा आनंद पेढे वाटून, रामाचं पूजन करुन जल्लोष करुन साजरा केला. औरंगाबाद येथे टीव्ही सेंटर चौकात मनसेच्या वतीने श्रीरामाचा फोटो घेऊन पूजन करण्यात येत होते, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामाची आरती करुन आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली.
दरम्यान, ठाकरे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी समजतं, परंतु सरकार हिंदुत्ववादी राहिलं नाही, श्रीरामाचं पूजन करण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला, या निषेध करतो, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे, श्रीरामाच्या फोटोसह आम्हाला अटक केली आहे, रामाचं पूजन झालंच पाहिजे, मंदिराचं पूजन धुमधडाक्यात झालं पाहिजे, आज तुम्ही आम्हाला थांबवलं, पण हिंदू नेहमी पूजन करणारच, रामाची पूजा करण्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही असं मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी सांगितले.
राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत होती. यासाठी अहमदनगर येथेही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली होती, दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, अशाप्रकारचे कृत्य केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भावनिक पत्र लिहिलं होतं, अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे. तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला होता.