मुंबई - अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रीय समाज पक्षांत वादाची ठिणगी पडली आहे. राज्यातील मित्रपक्षांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असले तरी, मित्र पक्षांना त्यांच्या जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद सर्वश्रुत असताना आता नगरमध्ये राम शिंदे आणि रासप यांच्यातील वैर समोर आले आहे. परंतु, हा वाद जामखेडमधून इच्छूक असलेले रोहित पवार यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
अहिल्याबाई होळकर शेळी, मेंढी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. रासपच्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या शिंदे यांना धडा शिकविण्याची वेळ आहे. भाजप आमचा मित्रपक्ष असला तरी राम शिंदे यांच्याविषयी आम्हाला सहानभुती नाही, असं दोडतले यांनी सांगितले. कर्जत-जामखेड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्जत-जामखेड मतदार संघात रासपचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. परंतु, येथील आमदार राम शिंदे यांनी कायमच आमच्या कार्यकर्त्यांना कमी लेखले आहे. आपल्याला महामंडळ मिळू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा नेत्याला ताकद दाखवून देण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे राम शिंदे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी रणनिती केली आहे. त्यामुळे शिंदे आणि रासप यांच्यातील वाद रोहित पवारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.