ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 04 - आपली संस्कृती एक वैश्विक संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये सर्व धर्माचा गाभा आणि तत्त्वे समाविष्ट आहेत. रामेश्वर येथे विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू जगातील सर्वात सुंदर सेतू आहे. कारण या सेतूच्या माध्यमातून विश्वशांती प्रस्थापित केली जाईल. या सेतूमध्ये विश्वाला एकत्रित करण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन विख्यात संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी मंगळवारी केले.
विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे यांच्या वतीने लातूर तालुक्यातील रामेश्वर (रूई) येथील सोनवळा नदीवर उभारण्यात आलेल्या विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.डॉ. सुनील गायकवाड, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, माजी केंद्रीय मंत्री डॉ. अरिफ मोहम्मद खान, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, फिरोज बख्त अहेमद, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. राजेंद्र शेंडे, माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस.एन. पठाण, डॉ. सिराज कुरेशी यांची उपस्थिती होती.
डॉ. भटकर म्हणाले, इंडोनेशियासारख्या मुस्लिमबहुल देशातही रामाची विधीवत पूजा केली जाते. त्याचबरोबर राम कथाही सांगितली जाते. प्रभू श्रीरामाला ‘मर्यादापुरुषोत्तम’ असेही म्हटले जाते. कारण श्रीराम फक्त हिंदू धर्मातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात पूजनीय आहेत. या विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूच्या माध्यमातून विश्वात शांती प्रस्थापित करण्यास मदत होईल.
या सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री डॉ. अरिफ मोहम्मद खान, डॉ. वेदप्रताप वैदिक यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर केरळ येथील बेना फातिमा, रामेश्वर येथील फरजाना युसुफ पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, सचिव प्रा.डॉ. मंगेश कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक सुरेशअप्पा कराड, डॉ. सुचिता कराड-नागरे, ज्योती कराड-ढाकणे आदींसह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
देखना श्रीराम जन्मोत्सव सोहळा...
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे रामेश्वर येथे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात सजावट करण्यात आली होती. सकाळी रथातून प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर मंदिरात प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम झाले. या देखण्या जन्मोत्सव सोहळ्याला राज्यभरातील विविध मान्यवर उपस्थित होते.