मुंबई : राज्यभरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेगाव, शिर्डी, नाशिक येथील प्रसिद्धी पावलेल्या मंदिरांसोबतच राज्यातील प्रत्येक राममंदिरात दिवसभर ओसंडता उत्साह होता. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रामनामाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता.साईनगरी शिर्डीत सोमवारपासूनच उत्सवाला सुरुवात झाली. मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने, साई दर्शनासाठी लाखो भाविकांच्या मांदियाळी झाली होती. साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या. भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पूजा करून, साईमूर्ती व साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला. शिर्डीतील रामनवमी उत्सवाचे यंदाचे हे १०५ वे वर्ष आहे. या वेळी एका भाविकाने ३५ लाख किमतीचे चांदीचे मखर द्वारकामाई मंदिरासाठी दिले, तर एकाने १२ किलो सोन्याचे कठडे समाधीला बसविले.श्रीगजानन महाराज संस्थानच्या वतीने शेगाव (जि. बुलडाणा) येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ९६३ भजनी दिंड्यांनी या सोहळ््यात सहभाग घेतला. उत्सवानिमित्त आयोजित रामायण स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान संस्थानचे विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रामनवमी आणि संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानोरा (जि. वाशिम) येथील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठी गत दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांमधील भाविक मोठ्या संख्येने पोहरादेवीत डेरेदाखल झाले. मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. (लोकमत न्यूज नेकवर्क)
रामरंगी रंगले भाविक!
By admin | Published: April 05, 2017 6:02 AM