- संजय पाठक, नाशिक
महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या सतरा जागाही रिपाइंला न देणाऱ्या भाजपाने दलित मतांची बेगमी करण्यासाठी आपल्या ध्येयनाम्यात रामदास आठवले यांची छबी वापरली आहे. विशेष म्हणजे खुद्द आठवले यांनीच मुंबई महापालिका वगळता आपली छबी वापरू नये, असे आवाहन केले असताना भाजपाने त्यांचे आवाहन धुडकावले आहे. मुंबई महापालिका वगळता अन्यत्र भाजपा आणि रिपाइंचे सूत जमले नाही. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत १२२ अनुसूचित जातीच्या अठरा जागा, तर अनुसूचित जातीच्या नऊ जागा राखीव आहे. त्यातील १६ जागा रिपाइंचे स्थानिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी मागितल्या होत्या. रिपाइंने हा प्रस्ताव पाठविला तेव्हा भाजपात इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. त्यामुळे मुलाखती संपल्यानंतर चर्चा करू, असे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर टाळाटाळ करीत दोन ते तीन जागा देण्याची तयारी दर्शविली.विशेष म्हणजे सातपूर विभागात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यासाठी जागा सोडण्यासही नकार देण्यात आला.