मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभुमीवर आज अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर आठवले यांनी केंद्रीय मंत्री असूनही पोलीस बंदोबस्त पुरवत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अंबरनाथमधील घटना वाईट होती. मी गाडीतून उतरल्यानंतर माझ्यावर तरुणाने हल्ला केला. यावेळी पोलीस हजर असते तर ही घटना टाळता आली असती. केंद्रीय मंत्री असूनही पोलीस आपल्याला सुरक्षा पुरवत नाहीत. जेथे जेथे जातो तेथे कार्यकर्तेच आजुबाजुला असतात, असे आठवले म्हणाले. तसेच अंबरनाथमध्ये शांतता पाळण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर आरपीआयच्यावतीने अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून शहरातील सर्व रिक्षा आणि सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे आरोपी गोसावी यांच्या घराला देखील पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.