अमरावती, दि. २२ - केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपाचे सरकार पडत नाही. कारण शरद पवार ‘आतून’ एनडीएसोबत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी अमरावती येथे केला.ना. आठवले हे अमरावती महापालिकेच्यावतीने आयोजित ‘स्वच्छ सेवा अभियाना’त सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेत ही बाब स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशहिताचे निर्णय घेत आहेत. नोटबंदी, जीएसटी, रस्ते विकास, नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग, उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना अशा विविध योजनांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिकेत असून न्यायालयाच्या अधीन राहून मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही अगोदरपासून रिपाइंची मागणी आहे. केंद्र सरकार संविधान बदलविणार हे विरोधकांचे दिशाभूल करणारे वक्तव्य असल्याचा आरोप त्यांनी केला.अधिकारी, कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. कोणत्याही कर्मचा-यांवर अन्याय होणार नाही, ही काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही ना. आठवले यांनी दिली. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर भाष्य करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. ते लवकरच भाजपात येणार असून रिपाइंची दारेही त्यांच्यासाठी खुली आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला त्यांनी लगावला. सत्तेतून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या धमकीला परतवून लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी अमरावतीचे महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, भाजपाचे पक्षनेता सुनील काळे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आ. अनिल गोंडाणे, नगरसेवक प्रकाश बनसोड, प्रदीप दंदे, कृष्णा गणविर, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते. दाऊद इब्राहिम सापडला तर भारतात आणूअंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात दडून बसला आहे. त्याला पकडून आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु दाऊद सापडला तर भारतात आणला जाईल, असेही ना. आठवले यांनी सांगितले. ज्याप्रमाणे अमेरिकेने लादेनचा खात्मा केला तिच अॅक्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी दाऊदबाबत घेतील, त्यानुसार केंद्र सरकारची व्यूहरचना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार एनडीएसोबत असल्याचा रामदास आठवलेंचा दावा, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 6:14 PM