कल्याण- मनसेने फेरीवाल्यांच्या मुद्यावर आक्रमक होऊन काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दाखवावी, असा टोला केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.
मु्ंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त टोला मनसेला लगावला आहे. फेरीवाल्यांच्या बाजू घेताना काँग्रसचे संजय निरुपम यांनी कायदा हाती घेऊ नये. तसेच मनसेनेही फेरीवाला प्रश्नी कायदा हाती घेऊ नये असंही आवाहन काँग्रेस व मनसेला रामदार आठवले यांनी केलं आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नी महापालिका व राज्य सरकारने लवकरच नियोजन करावे आणि फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी सूचना केली आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात मुंबईच्या उभारणीत उत्तर भारतीयांचा सहभाग आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर मनसेने मुख्यमंत्र्यांना भैयाभूषण पुरस्कार द्यावा असं वक्तव्य केलं. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, मुंबईच्या उभारणीत उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांचा सहभाग आहे. चणे विकणारा, पाणी पुरी विकणाऱ्याच्या मुंबईच्या उभारणीत सहभाग आहे. या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. मनसेने मुख्यमंत्र्यांना भैयाभूषण पुरस्कार देण्याऐवजी मराठी भूषण पुरस्कार द्यावा. मुख्यमंत्री हे नागपूरचे आहेत. शिवाय ते मराठी आहे. त्यामुळे त्यांना मराठीभूषण पुरस्कार मनसेने दिल्यास हा मनसेचाच गौरव असेल. मनसेने भैयाभूषण पुरस्कार देण्याची भाषा केली असल्याने मनसेला आठवले भूषण पुरस्कार देण्यास काय हरकत आहे असे ही त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीत मिश्कीलपणे सांगितलं.