मुंबई : एकीकडे युतीच्या जागांसाठी बोलणी सुरू असताना मित्रपक्षांनीही त्यांच्या मागण्या रेटायला सुरूवात केली आहे. आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवलेंनी युतीला 240 जागा मिळण्याचा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी-युतीमध्ये जागांचे वाटप सुरू झाले आहे. तर वंचित बहुजन आणि एमआयएममधील बोलणी फिस्कटल्याने तिसरी आघाडी फुटली आहे. या आघाडीने लोकसभेला काँग्रेस- राष्ट्रवादीला नामोहरम केले होते. याचा थेट फायदा भाजप, शिवसेनेला झाला होता.
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी या राजकीय घडामोडींवर आरपीआयचे पत्ते खोलले आहेत. आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेनेच्या युतीसोबत आहोत. युतीला 288 पैकी 240 जागा मिळतील. यामुळे आम्हाला 10 जागा हव्या असल्याची मागणी मांडलेली आहे, असे सांगितले.
युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. तर याच दरम्यान विधानसभेची आचारसंहिताही लागणार आहे. यामुळे शिवसेनेला 120 जागा आणि भाजपाला 160 जागा मिळण्याचे आकडे समोर येत आहेत. मात्र, मित्रपक्षांनी जादा जागांची मागणी केल्याने भाजपसमोर पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होणार का, 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला डावलून भाजपाने दिलेली कमी जागांची ऑफर शिवसेना स्वीकारणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसेनेची यादीही तयार करायला सांगितली आहे. त्यांच्याकडून ती आली की आम्ही आमच्या नेत्यांसमोर ठेवू आणि त्यावर निर्णय घेऊ', अशी युतीच्या जागावाटपाची अजब नीती उद्धव यांनी सांगितली. उद्धव यांच्या या विधानाचे दोन अर्थ काढले जाऊ शकतात. भाजपा-शिवसेनेत सगळं अगदी सामोपचाराने सुरू आहे, असं भासवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र त्याचवेळी, 'मोठ्या भावा'च्या रुबाबात भाजपा नेते त्यांना हवं तेच शिवसेनेवर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून मग त्यांनाच यादी करायला सांगितली, असा दुसरा अर्थही यातून निघतो. त्यातला कुठला अर्थ योग्य हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.