Ramdas Athawale News: अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे... अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे... कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला... अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला..., अशा एकामागून एक चारोळ्या करत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या सभेत महाविकास आघाडीवर टीका करताना, सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पाठवण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्जही भरला. यावेळी महायुतीची एक मोठी सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती घटक पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. रामदास आठवले यांनी या सभेत खास त्यांच्या शैलीतल्या कविता ऐकवताच उपस्थितांममध्ये चांगलाच हशा पिकला.
सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून
सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून... सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण..., असे सांगत रामदास आठवले म्हणाले की, सुप्रिया सुळेंबद्दल मला आनंद आहे. त्यांनी लोकसभेत चांगली भाषणे केली आहेत. आता सुनेत्रा पवारांना चांगली भाषणे करू द्या. त्यांना संसदेत जाऊ द्या. अजित पवारांनी सर्वांत आधी निर्णय घेतला की सुनेत्रा पवारांना उभे करायचे. तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना उभे करायला नको होते. ही सून बाहेरची कशी झाली, असा सवाल रामदास आठवले यांनी केला.
दरम्यान, शरद पवारांनी सोनिया गांधी बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केले होते. ज्या काँग्रेसने अन्याय केला, त्या काँग्रेससोबत जायची शरद पवारांना गरज नव्हती. शरद पवार इकडे आले असते तर अजित पवार इकडे आलेच असते. पक्षात फूट पडलीच नसती. शेवटी अजित पवारांना निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांचे घड्याळ गेले. गावागावातली म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार का घड्याळ सोडून वाजवत आहेत तुतारी?, अशी कविता करत रामदास आठवले यांनी शरद पवारांना टोला लगावला.